श्री माताजी

 

परम शोध

 

 

श्रीअरविन्द आश्रम

पाँडिचेरी

 

पान क्र. ०१


 

प्रकाशक :

श्रीअरविन्द आश्रम

पाँडिचेरी

 

मुद्रक :

श्रीअरविन्द आश्रम प्रेस

पाँडिचेरी

 

पान क्र. ०२


 

 

परम शोध

 

सर्वांगीण प्रगति करून घेण्याची आपली इच्छा असेल तर आपल्या जागृत आंतरिक जीवनांत निर्भेळ आणि दृढ असा एक मानसिक समन्वय घडविला पाहिजे. म्हणजे बाह्य विलोभनांपासून आपलें रक्षण करणाऱ्या कवचाप्रमाणें, चुकीच्या मार्गापासून वांचवून योग्य मार्ग दाखविणाऱ्या रस्त्यावरील खुणेच्या फलकाप्रमाणें व हेलावणाऱ्या जीवनसागरामध्यें आपला मार्ग प्रकाशित करणाऱ्या दीपस्तंभाप्रमाणें तो ठरेल.

ह्या समन्वयाची रचना प्रत्येकानें आपल्या प्रवृत्ती, अभिरुची आणि आकांक्षा यांना अनुसरून केली पाहिजे. हा समन्वय खरोखरी जिवंत व तेजस्वी व्हावा अशी आपली इच्छा असेल तर प्रत्येक जीवमात्राच्या अंतर्यांमीं विराजणाऱ्या व आपल्या ठिकाणीं प्राणज्योतिरूपानें वसणाऱ्या तत्त्वाची आपल्याला जी प्रातिनिधिक कल्पना वाटते अशा कल्पनेभोंवतीं हा समन्वय साधला पाहिजे.

प्रत्येक युगांत ह्या तत्त्वाची शिकवण आपल्या प्रासादिक वाणीनें भिन्न भिन्न स्वरूपांत थोर संतांनीं दिलेली आहे.

व्यक्तिगत 'मी' आणि विश्वगत विराट पुरुषाचा 'मी' हे दोन्ही एक आहेत. जें जें आहे तें तत्त्वत: आणि सारत: शाश्वत काळ सतत आहेच. तर मग अस्तित्व आणि त्याचा उगम, आपण स्वत: आणि आपलें प्रारंभस्थान असा भेद तरी आपण कां करावा ?

''आपण आणि आपलें उत्पत्तिस्थान, आपण आणि आपला परमेश्वर दोघें एकरूप आहोंत'' ही प्राचीन लोकांची उक्ति यथायोग्यच आहे.

पण हें एकत्व म्हणजे अतिशय घनिष्ठ किंवा कमीअधिक जवळचा

पान क्र. ०३


 

आंतरिक संबंध एवढेंच न समजतां त्याचें खरेखुरें तादात्म्य असा त्याचा अर्थ घेतला पाहिजे.

परमेश्वराचा शोध करणारा मनुष्य जाणीवेच्या दुर्गम शिखरापर्यंत हळु हळु, पायरीपायरीनें जाण्याचा जेव्हां प्रयत्न करतो तेव्हां, त्याचें सारें ज्ञानभांडार, त्याची सारी अंत:स्फूर्ति त्याला या अनंताप्रत एक पाऊलभरहि पुढें नेऊं शकत नाहीं, हें तो विसरतो. आपल्यापासून फार दूर आहे, अशा समजुतीनें ज्याच्या प्राप्तीची तो इच्छा करतो, तें त्याच्याच अंतरंगांत विद्यमान् आहे, हेंहि त्याला माहीत नसतें.

कारण स्वत:च्या अंतरंगांत वस्तुमात्राच्या मूळतत्त्वाची प्रचीति जोपर्यंत त्याला आलेली नाहीं तोपर्यंत त्या मूळतत्त्वाविषयीं मनुष्यास कसलेंहि ज्ञान कसें होऊं शकणार ?

स्वरूपबोध करून घेऊन, आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यास शिकूनच मनुष्यास सर्वोत्तमाचा साक्षात्कार शक्य होईल; आणि, 'अरे, ईश्वराचें निवासमंदिर तर हेंच येथें आहे, आणि मला तर त्याची जाणीवहि नव्हती.' असें बायबलमध्यें उल्लेख केलेल्या जेकबच्या मुलाप्रमाणें तो उद्‌गार काढील.

आणि म्हणूनच, हा महान्, प्रभावी व भौतिक जगाची उत्पत्ति करणारा विचार आपण शब्दरूपांत व्यक्त केला पाहिजे; म्हणजे 'मीच प्रत्येक वस्तूच्या अंतरंगांत आणि जीवमात्राच्या ठिकाणीं विद्यमान् आहे' हा, स्वर्ग आणि धरा यांमध्यें भरून राहिलेला ध्वनि सर्वांच्या कानापर्यंत जाऊन पोहोंचेल.

ज्यावेळीं आपणां सर्वांस हें उमगेल त्याचवेळीं पूर्वनियोजित महान् रूपांतराचा दिवस समीप आलेला असेल. जेव्हां जड, पार्थिव तत्त्वाच्या प्रत्येक अणूच्या पोटीं वसणाऱ्या ईश्वरी इच्छेची मनुष्यास ओळख पटेल, जेव्हां प्रत्येक सजीव प्राण्यामध्यें ईश्वराच्याच हाल-

पान क्र. ०४


 

चालीचें रूप तो पाहील, प्रत्येक मानवबंधूच्या ठिकाणीं ईश्वराचें दर्शन घेण्यास समर्थ होईल, अशाचवेळीं अंधकार, असत्य, अज्ञान, प्रमाद आणि दुःखक्लेश यांचा पाठलाग करून त्यांना पळवून लावून, त्यांचा पृथ्वीवरील भार नाहींसा करणारी उषा उदय पावेल. कारण त्रस्त होऊन आक्रोश करणारी अखिल प्रकृतीच अमृतत्त्वाच्या पुत्रांच्या -- देवमानवाच्या -- आगमनाची प्रतीक्षा करीत आहे.

खरोखरी हाच असा एक मध्यवर्ति विचार आहे कीं ज्यामध्यें अन्य सर्व विचार समाविष्ट झालेले आहेत. आणि म्हणूनच सारें जीवन उजळून टाकणाऱ्या सूर्याप्रमाणें हा विचार आपल्या स्मृतीमध्यें आपण सतत तळपत ठेवला पाहिजे.

याच कारणाकरतां त्या विचाराची स्मृति मी तुम्हांस आज करून देत आहे. कारण एकाद्या दुर्मिळ रत्नाप्रमाणें, मूल्यवान् संपदेप्रमाणें जर हा विचार आपल्या हृदयामध्यें जतन करून आपण आपला मार्ग आक्रमीत गेलो, आपल्या ठिकाणीं या विचाररत्नाचें सतत प्रकाशकिरण फेंकण्याचें, रूपांतरकार्य आपण जर चालू राहूं दिलें, तर प्रत्येक वस्तुमात्राच्या ठायीं आणि प्राणिमात्राच्या अंतर्यामीं तोच विचार जागृत असल्याचें आपणांस कळेल आणि तेथेंच अखिल विश्वाच्या अद्‌भुत एकत्वाची अनुभूति आपणांस येईल.

नंतर त्यामुळें, खरोखर आपण किती तुच्छ विषयांत व्यर्थ आणि बालिश समाधान घेतो, आपले वादविवाद किती मूर्खपणाचे असतात, आपल्या वासना किती क्षुद्र आणि आपला क्रोध किती अज्ञानाधिष्ठित आणि आंधळा असतो ह्याची आपणांस खात्री पटेल. आणि पुढें आपल्या ठिकाणच्या लहानसहान दुर्बलता विलय पावलेल्या आहेत आणि संकुचित व्यक्तिमत्त्वाच्या व निर्बुद्ध अहंकाराच्या अंतिम भिंती कोसळून पडल्या आहेत असेंहि आपल्या

पान क्र. ०५


 

दृष्टोत्पत्तीस येईल. आपल्या सीमाबद्ध चाकोरींतून आणि मर्यादित चार भिंतींच्या बाहेर आपणांस ओढून काढून खऱ्या आध्यात्मिकतेच्या एका महान् प्रवाहामधून आपण वहात जात आहों असाहि त्यावेळीं आपणांस अनुभव येईल.

व्यक्तिगत 'मी' आणि विश्वपुरुषाचा 'मी' हे दोन्हीं एक आहेत. प्रत्येक जग, प्रत्येक जीव, प्रत्येक वस्तु, प्रत्येक अणुपरमाणु यामध्यें परमेश्वराचें अस्तित्व आहे आणि स्वतःमध्यें त्याची अभिव्यक्ति करणें हेंच प्रत्येक मनुष्याचें नियत-कार्य आहे.

प्रथम मनुष्यानें त्याकरितांच, आपल्या ठायीं असलेल्या ईश्वरी अस्तित्वाविषयीं अधिकाधिक जागृत झाले पाहिजे. ही जागृति येण्यासाठीं कांहीं लोकांना नम्र शिष्यभावानें चांगलीच उमेदवारी करावी लागते. त्यांच्यांतील अहंकारी वृत्ति सदा वखवखलेली, ठरीव व रूढ मार्ग न सोडणारी असल्यामुळें तिच्याच विरुद्ध त्यांना दीर्घकालिक व दुःखपूर्ण असा झगडा करावा लागतो. उलट, दुसरे कांहीं लोक स्वभावतःच अधिक निरहंकारी, अधिक सहजगम्य -- परिस्थितीशीं सहज जुळवून घेणारे -- आणि आध्यात्मिकवृत्तीचे असतात. त्यामुळें ते सहज, लीलेनें स्वतःचें उगमस्थान जें अक्षय्य दिव्यतत्त्व, त्यामध्यें प्रविष्ट होऊं शकतात. पण आपण हें विसरतां कामां नये कीं त्यांच्यामधील शुद्ध प्रकाशाची प्रभा कोणत्याच गोष्टीनें पुन: झांकोळली जाऊं नये म्हणून अशा लोकांनीं सुद्धां आपली प्रकृति अनुकूल व रूपांतरित होण्यासाठीं नित्य-निरंतर पद्धतशीर रीतीनें अधिक समर्पणभावानें, साधना केली पाहिजे.

एकदां कां ही गहन असलेली जाणीव आपल्यास प्राप्त झाली म्हणजे खरोखर आपला दृष्टिकोनहि कसा बदलून जातो ! बुद्धि किती व्यापक होते आणि हृदयाची विशालता किती वाढूं लागते !

पान क्र. ०६


 

या संबंधी एका साधूनें म्हटलें आहे -- ''माझी अशी इच्छा आहें कीं अति नीच मनुष्याच्या अंतर्यामींहि तुम्ही ईश्वराचा अंश पाहूं शकाल अशी अवस्था तुम्हां प्रत्येकाला प्राप्त झाली पाहिजे. त्या नीच मनुष्याचा तिरस्कार करण्याऐवजीं तुम्ही त्याला असें म्हटलें पाहिजे, ''हे देदीप्यमान् पुरुषा ! जागृत हो, तूं नित्य शुद्ध आहेस; तुला जन्म नाहीं, तूं मृत्यूहि जाणत नाहींस; हे सर्वशक्तिमन्ता, ऊठ, तुझें स्वरूप प्रकट कर.''

या परम सुंदर उक्तिनुसार आपण वागूं या. आणि पहा, लगेच एकादा चमत्कार घडल्याप्रमाणें आपल्या भोंवतालची सर्व परिस्थिति पार पालटून गेलेली आपणांस दिसेल.

यथार्थ व खऱ्या प्रेमाची, जागृत आणि सूक्ष्मदर्शी प्रेमाची हीच रीत आहे. बहिरंगाच्या पलीकडे कसें पहावयाचें तें हेंच प्रेम जाणतें, शब्दांवांचून त्याला कळूं शकतें; असें हें प्रेम अनेक अडथळे व अडचणी यांमधून जात असतांनाहि जीवमात्राच्या अंतरतम प्रदेशीं वसणाऱ्या तत्त्वाशीं निरंतर अनुसंधान राखत असतें.

आपल्या भावनांचे उद्रेक, आपल्या वासना, आपली उदासीनता, आपली कठोरता, आपले दुःखभोग आणि संघर्ष, आपल्या जीवनांतील चढ उतारांची आपल्या अनिर्बंध कल्पनेनें रंगविलेलीं अतिरंजित चित्रें, हीं या प्रेमासमोर कशी कःपदार्थ ठरतील ! अंतरंगांत अंतरतम प्रदेशांत राहून आपल्यावर कृपाछत्र धरणाऱ्या, आपलें दौर्बल्य सहन करून आपले प्रमाद सुधारणाऱ्या, आपल्या जखमा भरून काढून आपल्या संपूर्ण अस्तित्वास त्याच्या नवजीवनदायी तुषारांनीं न्हाऊं घालणाऱ्या महान उदात्त, दिव्य प्रेमासमोर त्यांची कितीशी किंमत !

आपल्यांतील परमेश्वर-दिव्यता-कधीं सक्ति करीत नाहीं; कसलाहि हक्क सांगत नाहीं कीं भय दाखवीत नाहीं; ती स्वतःचेंच

पान क्र. ०७


 

आत्मदान करते, स्वत:ला देऊन टाकते, प्राणिमात्र आणि वस्तुजात यांच्या हृदयगुंफेंत लपून असते; स्वत:ला विसरवून टाकते, स्वत: विरून जाते. कोणाला दोष देत नाहीं, कीं गुणदोषांचें मापन करीत बसत नाहीं. कोणास शाप देत नाहीं, कीं कोणाची निंदा करीत नाहीं. उलट, त्रास वाटून न घेतां पूर्णत्व प्राप्त करून देण्यासाठीं, टाकून न बोलता सुधारण्यासाठीं, उतावीळपणा न करतां उत्साह देण्यासाठीं, ग्रहणशक्तीनुसार सर्व प्रकारची संपत्ति देऊन प्रत्येक मनुष्यास समृद्ध करण्यासाठीं ती निरंतर कार्यरत असते. ती माउली आहे. तिचें प्रेम पोटी धरतें व भरणपोषण करतें; सांभाळ करतें व रक्षण करतें; सल्ला देतें व सांत्वन करतें; कारण ती सर्वांस जाणते, सर्वांना आधार देते; चुकांकडे दुर्लक्ष करते व क्षमा करते; सर्वांविषयीं आशा बाळगते आणि सर्वांना सुसज्ज करते. सर्वच गोष्टींना तिच्याठायीं जागा असल्यानें, असलेलें सर्वच सर्वांसाठीं असतें. ती सर्वांचें अनुशासन करते; आणि म्हणूनच ती सर्वांचीच सेवकहि असते. याच कारणासाठी लहान अथवा थोर, जे कोणी लोक तिच्या बरोबर सत्ताधीश होण्याची किंवा तिच्यामधील देवपद मिळवण्याची इच्छा करतात, ते तिच्याप्रमाणे सर्व बांधवांमध्यें सर्वसेवक बनून जातात : केवळ जुलमी सत्ताधीश बनत नाहींत.

सेवकाची ही विनम्र भूमिका खरोखर किती सुंदर आहे ! सर्वांच्या अंतर्यामीं असलेल्या परमेश्वराचे संदेशदूत होणें आणि सर्व वस्तूंना जीवन देणाऱ्या दिव्य प्रेमाची अभिव्यक्ति करणें हें ज्यांचें जीवितकार्य आहे त्या सर्वांचीच अशी सेवकाची भूमिका असते.

आणि जोपर्यंत अशा लोकांचा आदर्श अनुसरणें आपल्याला शक्य नाहीं, त्यांच्यासारखें खरे सेवक आपण होऊं शकत नाहीं, निदान तोपर्यंत तरी आपणामध्यें प्रवेश करून आपलें परिवर्तन

पान क्र. ०८


 

करण्यास, या दिव्यप्रेमास, वाव देऊं या. आपलें हे पार्थिव शरीर हें अद्‌भुत यंत्र-नि:शेषतया ईश्वराच्या स्वाधीन करूं या. तो या शरीराकडून प्रत्येक कार्यक्षेत्रांत, प्रत्येक भूमिकेंत अधिक कार्य करवून घेईल.

संपूर्ण समर्पणाची अशी अवस्था प्राप्त करून घेण्यासाठीं सर्व साधनें चांगलींच आहेत आणि सर्व पद्धतींना त्यांचें त्यांचें महत्त्वहि आहे. परंतु ही एक गोष्ट मात्र मुळींच टाळतां येणार नाहीं, ती म्हणजे -- ध्येयप्राप्ति करून घेण्याविषयीं झालेला निश्चय सतत दृढ ठेवणें, ही होय. कारण त्यामुळें, आपण जें जें अध्ययन करतो, जीं कार्यें सिद्धीस नेतो, ज्या व्यक्तींशीं आपला संबंध येतो, त्या त्या सर्व गोष्टी कांहींतरी शिकवितात, उद्बोधक ठरतात, साह्यक ठरतात, व मार्गदर्शक प्रकाश पुरविणाऱ्या ठरतात.

माझें हें प्रवचन संपविण्यापूर्वीं आणखी कांहीं गोष्टी मी सांगूं इच्छिते. ज्या लोकांनीं आजवर अनेक प्रयत्न केले आहेत, पण वर वर पाहतां तरी ते निष्फळच ठरले आहेत; आध्यात्मिक मार्गावरील मोहांचा ज्यांना परिचय झाला आहे; आणि त्यामुळें आपलें स्वत:चें दौर्बल्यहि कळून चुकलें आहे, ज्यांचा आत्माविश्वास आणि धैर्य खचल्यामुळें जे धोक्यांत सांपडले आहेत, अशा लोकांसाठीं मीं कांहीं पृष्ठें जोडणार आहे. हीं पृष्ठें मूळ एका आध्यात्मिक मार्गावरील साधकानें लिहिलेलीं आहेत. ज्यावेळीं अनेक प्रकारच्या कठीण संकटांनीं, शुद्धिकरतां कराव्या लागणाऱ्या अग्निदिव्याप्रमाणें चारी बाजूंनीं, त्याला घेरून टाकलें होतें, अशा समयीं, दु:खित आणि निराश अंत:करणांत आशेचा किरण नेण्यासाठीं त्यानें हीं पानें लिहिलेलीं आहेत.

*         *         *

हे लोकहो ! तुम्ही थकले भागलेले आहांत, परिस्थितीच्या कोंडींत अडकलेले आहांत, सर्व बाजूंनीं तुम्हांवर आघात होत आहेत.

पान क्र. ०९


 

तुम्ही अधःपतित झाला आहांत आणि आपण पराभूत झालो आहोंत असेंहि तुम्हांस कदाचित् वाटूं लागलें असेल, तर तुमच्या या मित्राचे बोल ऐका. तुमचे कष्ट व दुःखें त्यास माहीत आहेत, तीं त्यानें भोगलीं आहेत; तुमच्याचप्रमाणें जगाचे सारे दुःखताप त्यानें सहन केले आहेत; कष्टांचा बोजा पाठीवर घेऊन सारा दिन त्यानें तुमच्याप्रमाणें वाळवंटें तुडविली आहेत, भूक आणि तहान यांचा त्यास अनुभव आहे. अकेलेपणा आणि परित्यक्तता, नव्हे, सर्वांत कठोर अशी अनाथ हृदयांतील कालवाकालव त्यास माहीत आहे; हाय ! संशयाचें वादळ काय असतें, हेंहि त्याला माहीत आहे. प्रमाद, कमतरता, पेंचप्रसंग सर्व प्रकारच्या दुर्बलता, ह्या त्यानें अनुभवलेल्या आहेत.

पण तोच तुम्हांस सांगत आहे : धीर धरा ! प्रतिदिनीं प्रात:काळीं आपल्या पहिल्या किरणांच्या द्वारां उगवता दिनमणी जी शिकवण, जो संदेश अवनीला देतो तो ऐका; तो आशेचा किरण देतो; सांत्वनपर संदेश आणतो.

तुमच्या विपन्नावस्थेची कल्पना करण्याइतके किंवा तुमच्या वेदनांचे परिणाम सहन करण्याइतकेहि धैर्य तुमच्याजवळ नाहीं, म्हणून तुम्ही रडत आहांत, दुःख भोगत आहांत, भयकंपित झालां आहांत ? तर पहा ! अशी कोणतीच निशा नाहीं जिच्या अंतीं उषेचा उदय होत नाहीं; अंधकार जेव्हां अति घनदाट होतो त्याचवेळीं उषेचें आगमन होण्याची तयारी झालेली असते, सूर्यप्रकाशानें ज्याचा विलय होणार नाहीं असें कोणतेच धुकें नसतें, आणि त्याच्या उज्ज्वल किरणांनीं ज्याची कड सोनेरी होत नाहीं असा कोणताच मेघ नसतो. असा कोणता अश्रु आहे जो कधींच सुकणार नाहीं ? असें कोणतें तुफान असतें कीं ज्याच्या शेवटीं विजयदर्शक इंद्रधनु सप्त किरणांनीं चमकणार नाहीं ? सूर्यप्रकाशानें वितळणार

पान क्र. १०


 

नाहीं असें बर्फ कुठें आहे कां ? किंवा असा कोणता शिशिर ऋतु आहे ज्याची परिणति उल्हसित वसंतामध्यें होणार नाहीं ?

तसेंच तुमच्या बाबतींत : जिची दुसरी बाजू म्हणून संपन्नावस्था प्राप्त होत नाहीं अशी कोणतीच विपन्नावस्था नसते, आनंदामध्यें परिवर्तन करतां येणार नाहीं असे कोणतेच दु:ख-संताप किंवा क्लेश नसतात. विजयाचें रूप धारण करूं शकणार नाहीं असा कोणताच पराजय नसतो. उच्चतर भूमिकेवर चढण्यास उपयोग करतां न येण्याजोगें कोणतेंच अध:पतन नसतें, प्राणिमात्रांचें वसतिस्थान होऊं शकणार नाहीं अशी कोणतीच निर्जनता नसते. सुसंवादामध्यें मेळवितां न येईल असा कोणताच विसंवाद नसतो, कधींकधीं दोन व्यक्तींमधील गैरसमज हाच त्या व्यक्तींचा समेट घडविण्यास त्यांना भाग पाडतो, सारांश अशी कोणतीच अतीव दुर्बलता नाहीं कीं जिचें सामर्थ्यामध्यें परिवर्तन करतां येणार नाहीं. एवढेंच काय, पण परमावधीच्या दुर्बलतेमध्येंच सर्वशक्तिमान् ईश्वर आत्माविष्कार करण्याचें पसंत करतो.

ऐक, बाळा ऐक. आज तूं स्वत:ला इतका भग्नहृदय, इतका अध:पतित समजत आहेस, तुझ्याजवळ आज कांहींहि राहिलेलें नाही तुझें दारिद्र्य झांकायला, तुझा अभिमान पोसायला तुझ्याजवळ कांहींहि नाही, पण तरीहि यापूर्वीं इतका थोर तूं कधींच नव्हतास ! खरोखर जो पतनाच्या खोल दरींतहि जागृत रहातो तो उंचशिखराच्या कितीतरी अधिक समीप असतो ! कारण आपण जितके खोलवर दरींत जाऊं तितक्या अधिक प्रमाणांत उंच शिखरांचें आपणांस दर्शन होतें.

तुला हें माहीत आहे कां कीं विश्वांतील महान् सृजनशक्ती -- चैतन्यशक्ती -- जड पार्थिवतेचें अत्यंत अपारदर्शक दाट आवरण घेऊं

पान क्र. ११


 

इच्छितात ? सर्वसत्ताधीश प्रेमाचा तमोमय पार्थिवतेशीं आणि अत्यंत ऐश्वर्यसंपन्न प्रकाशाचा अंधकाराविषयींच्या आवडीशीं होणारा संगम खरोखर किती अदभूत आहे !

जर अग्निपरीक्षायुक्त संकटांनीं व प्रमादांनीं तुम्हाला पछाडलें असेल, दु:खाच्या खाईंत तुम्ही बुडून गेला असाल, तरीहि मुळींच शोकमग्न होऊं नका. कारण ईश्वरी करुणा, ईश्वराचे परम आशीर्वाद तेथेंहि तुमच्याप्रत येतील. शुद्धि करणाऱ्या दु:खांच्या मुशींतून तुम्ही तावून सुलाखून निघालां आहांत म्हणूनच पुढें तुमच्यासाठीं उज्ज्वल शिखरें सिद्ध आहेत.

तुम्ही निर्जन वालुकारण्यांत आहांत ? तर मग नीरवतेंतील शब्द श्रवण करा. तुमची प्रशंसा आणि तुमचा उदोउदो करणाऱ्या बाहेरच्या शब्दांनीं आजवर तुमचे कान आनंदानें भरून टाकले आहेत; पण नीरवतेच्या ध्वनीनें तुमच्या आत्म्याला आनंद होईल, अंतरतम प्रदेशांतील पडसाद तेथें ऐकूं येतील व दिव्य सुसंवादाचें संगीत तेथें निर्माण होईल.

गडद अंधेऱ्या रात्रीं तुम्ही प्रवास करीत आहांत ? हरकत नाहीं. अंधकाराची सारी अमूल्य संपदा गोळा करा. तळपणारा सूर्यप्रकाश बुद्धीचे मार्ग उज्ज्वलित करतो, पण रात्रींच्या शुभ प्रभेमध्येंच पूर्णतेप्रत जाणारे गुप्त मार्ग दृष्टीस पडतात व आध्यात्मिक संपत्तीचें गूढहि तेथेंच हस्तगत होतें.

कफल्लक होण्याच्या मार्गावर तुम्ही आहांत काय ? तोच मार्ग तुम्हांस समृद्धीकडे घेऊन जाईल. ज्यावेळीं तुमच्या जवळ कांहींच शिल्लक रहणार नाहीं त्याचवेळीं तुम्हांला सर्व कांहीं दिलें जाईल. कारण जे लोक निष्ठावान आणि सरळमार्गी असतात त्यांच्या बाबतींत नेहमीं अतिशय अमंगलांतूनच परममंगल निघतें.

पान क्र. १२


 

धरणीमध्यें पेरलेल्या एका बीजामधून हजारों दाणे निर्माण होतात, दु:खरूप पक्षाच्या पंखाची प्रत्येक हालचाल म्हणजे - वैभव शिखराच्या दिशेनें अधिकाधिक वर चढणें असूं शकते.

एकाद्या मनुष्यावर शत्रु घाला घालतो व त्याला नष्ट करण्यासाठीं तो जें कांहीं करतो त्या सर्वांमुळें उलट त्याची थोरवीच वाढते.

आतां त्रिभुवनांची कहाणी ऐक. पहा. महान् प्रभावी शत्रु सर्वत्र विजयी होत असल्याचें दिसत आहे. प्रकाशोद्भव जीवांना तो रात्रींच्या पोटांत फेंकून देत आहे आणि त्यामुळेंच रजनी तारकांनीं भरून जात आहे. विश्वकार्याच्या विरुद्ध अधिक क्रोधानें तो तुटून पडत आहे, जगदुत्पत्तिकालीन आदिमंडलांच्या साम्राज्यावर तो आघात करीत आहे, त्यांच्यामधील सुसंवाद छिन्नभिन्न करीत आहे, त्यांचे तुकडे तुकडे करीत आहे; त्यावरील धूळ दाही दिशांना उधळून देत आहे; आणि पहा, याच धूलिकणांचे सुवर्णमय बीजामध्यें रूपांतर होऊन अनंताची भूमि सुपीक होत आहे. आणि स्वत:च्या शाश्वत केंद्राभोंवतीं, विशालतर अवकाशाच्या कक्षेमध्यें फिरणाऱ्या अनेक जगांनीं ही अनंताची भूमि गजबजून जात आहे. अशारीतीनें विभजनच समृद्धतर आणि गभीरतर एकत्वास जन्म देतें, आणि ज्या साम्राज्याचा नाश करायला तें उठलें होतें त्याऐवजीं भौतिक विश्वाची अधिक वाढ करून तेंच साम्राज्य अधिक विशाल करीत आहे.

असीमतेच्या वक्ष:स्थलावर जोजावल्या जाणाऱ्या, फुलवल्या जाणाऱ्या उत्पत्तिकालीन आदिमंडलांचें संगीत नि:संशय सौंदर्यपूर्ण होतें; परंतु तारकापुंजांचें वृंदवादन, समस्त भुवनांचा नादध्वनि, शाश्वत सुयशगानांनीं दुमदुमवून टाकणारें समृद्ध दिव्य प्रार्थना-गीत हें त्याहूनहि कितीतरी अधिक सुन्दर आणि विजयामोदपूर्ण असतें !

पान क्र. १३


 

अजूनहि ऐक ! मनुष्य त्याच्या दिव्य उगमापासून दुरावला जाऊन पृथ्वीवर आला त्यावेळेपेक्षां तो संकटांनीं कधींच अधिक ग्रासला गेलेला नाहीं. त्यावेळीं त्याला लुबाडणाऱ्या आसुरी शक्तींचें सक्तीचें अधिराज्य त्याच्यावर गाजत होतें आणि क्षितिजाच्या देवडीवर हातांत जळत्या तलवारी घेऊन सुसज्ज झालेले पहारेकरी त्याची खडसावून तपासणी करीत होते. पण त्यानंतर जीवनाच्या आदिउगमापर्यंत तो पुन: चढूं शकला नाहीं, म्हणून तो मूळ प्रवाहच त्याच्या अंतरंगांतून वर उसळला; उर्ध्वतर प्रकाशाचा झोत स्वीकारण्यास तो असमर्थ झाला, म्हणून तो प्रकाशच स्वत: त्याच्या जीवनाच्या केंद्रभागीं तळपूं लागला. परात्पर प्रेमाशीं संयुक्त होऊन तो राहूं शकेना, म्हणून त्या प्रेमानेच स्वत:ची आत्माहुति दिली आणि प्रत्येक पार्थिव वस्तूस व जीवमात्राच्या अहंकारासच आपलें निवासस्थान, आपलें पावन मंदिर मानून त्यानें स्वत:चें समर्पण केलें.

आणि म्हणूनच तिरस्कृत परंतु सुपीक, परित्यक्त व परमधन्य अशा जड पार्थिवतेच्या प्रत्येक अणुपरमाणूमध्यें एक एक दिव्य भाव विद्यमान् आहे, प्रत्येक जीवमात्राच्या अंतर्यामी स्वयं भगवान् विराजमान आहे ! अखिल विश्वांत मानवाइतका दुर्बल प्राणी दुसरा कोणता नसला, तरी त्याच्याइतका दिव्यहि एकटा तोच आहे.

खरेंच, अत्यंत नम्रतेमध्येंच परम वैभवाचें बीज असतें !

* *

----------------------------------------------

Reprinted from the Sanjivan, February and March 1955.

पान क्र. १४